कदाचित हेच आहे प्रेम (sample) - अभिषेक दळवी (love novels in english TXT) 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «कदाचित हेच आहे प्रेम (sample) - अभिषेक दळवी (love novels in english TXT) 📗». Author अभिषेक दळवी
" ह्याला म्हणतात डोकं.......तो काहीच बोलत नाहीये फक्त तोंड हलवतोय आम्ही शाळेत असताना असच करायचो. कोणालाही अजिबात संशय यायचा नाही " ही कमेंटसुद्धा विकीनेच केली.
त्यानंतर एक मुलगा आला आणि दोन मिनिट माईक पकडून तसाच उभा राहिला
त्याला काय बोलाव काहीच कळत नव्हत शेवटी कोणती तरी पंचतंत्राची गोष्ट सांगून तो निघून गेला.
" ह्याला म्हणतात फालतूगिरी. बोलायला सांगीतलय ना म्हणून काहीही बोलायचं.
" आतासुद्धा विकीनेच कमेंट केली होती त्याच्या या कमेंट्स ऐकून मी फार हसत होतो .
नंतर एक मुलगी आली तिचा ऍटीट्यूड पाहून वाटल काहीतरी चांगल बोलेल पण तिचा विषय ऐकूनच आमचा मूड गेला .विषय होता ' फेमीनिजम ' .सर्वात आधी देवाने तिला मुलगी म्हणून जन्म दिला याबद्दल तिने देवाचे आभार मानले .त्या नंतर तिने बोलायला सुरुवात केली ती थांबतच नव्हती .
" तुला माहितीये अभी, ब्लॅक पँथर हा जगातला सर्वात दुर्मिळ प्राणी आहे पण त्याला जितका स्वतःवर अभिमान नसेल ना तितका हिला आहे. जस काय ही एकच मुलगी म्हणून जन्माला आलीय बाकी सगळ्या आकाशातून पडल्या आहेत." ही कमेंट सुद्धा विकीचीच होती .
ती मुलगी आता स्त्री अत्याचारावर बोलायला लागली .तस स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मी सुद्धा आहे .पण ती अशी बोलत होती की काही क्षणांसाठी मला अस वाटू लागलं या जगातला प्रत्येक पुरुष स्त्रियांवर अत्याचार करायला जन्माला आलाय आणि अत्याचार करण्याशिवाय पुरुषांकडे अजून काही कामधंदेच नाहीत. पाच मिनिटांचा टाईम दिला होता पण दहा मिनिट झाली तरी तिची बडबड चालूच होती. तिच्यासारख्याच काही मूली सोडल्या तर सगळे जण बोर झाले होते पण ती काही हातातला माईक सोडत नव्हती. शेवटी तिला थांबवायला विकीच पुढे आला. त्याने ती बोलत असताना मधुनच टाळ्या वाजवायला सुरुवात केली .आम्ही शाळेत असताना आम्हाला २६ जानेवारीला भर उन्हात मैदानात बसवून शाळेने बोलावलेले नेते भाषण द्यायचे जेव्हा आम्ही बोर व्हायचो तेव्हा असच टाळ्या वाजवून आम्ही त्यांना डिस्टर्ब करायचो .आताही विकी दर एक मिनिटांनी टाळ्या वाजवत होता आणि बाकीची सर्व मूलही त्याला साथ देत होती .जी मुलगी मघासपासून बोलत होती हा सर्व गोंधळ पाहून तिचा चेहरा रागाने लालबूंद झाला होता .शेवटी
" स्त्रियांचा आदर करा " अशी आरोळी ठोकून तिने तिची बडबड संपवली .
त्यानंतर माझ्याच पुढच्या रो मधे एक मुलगी बसली होती ती उठून स्टेजकडे जाऊ लागली .मी तिचा चेहरा पाहिला नव्हता पण मला अस वाटत होत की मी तिला ओळखतोय किंवा मी तिला पाहीलयं .ती स्टेजवर गेली माईक घेतला आणि आमच्यासमोर वळली तिचा चेहरा पाहून मी आपोआपच खुर्चीत ताठ बसलो , माझ्या हृदयाची स्पंदन आपोआप वाढू लागली ही तीच मुलगी होती जिला मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी पाहील होत .सफेद चूड़ीदार , मोकळे सोडलेले केस , लाल लिपस्टीक लावलेल्या ओठांवर असलेल स्मितहास्य , कानाच्या मुलायम पाळीवर अडकवलेले झूमके तिला पाहून मला सर्वात पुढच्या रो मधे जाऊन बसायची फार इच्छा होत होती पण पुन्हा मघाससारख बाहेर काढण्याची भीती होती म्हणून नाईलाजाने मी तिथेच बसून राहिलो .तिने आपल्या नाजुक बोटंानी माईकवर टकटक केली आणि बोलू लागली .ती बोलू लागल्यावर मी लक्ष देऊन तिचा प्रत्येक शब्द ऐकू लागलो तिचा आवाज मी फार दिवसांनंतर ऐकत होतो .अस वाटत होत की तिने फक्त बोलत राहाव आणि मी ते ऐकत तिला पाहत राहाव ती कोणत्या तरी मुलीची स्टोरी सांगत होती जी जन्मापासून कधीच मनासारख आयुष्य जगली नव्हती .सतत तिच्यावर तिच्या वडिलांची मत लादली गेली इतकच काय तिला तिचा जीवनाचा जोडीदार शोधायचही स्वातंत्र्य नव्हत .ती ही स्टोरी सांगत असताना हॉलमधली सगळी मूल शांत बसली होती अगदी विकीसुद्धा शांतपणे तीच बोलणं ऐकत होता .सलग चार मिनिट ती फार भरभरून बोलत होती त्या नंतर तिचा आवाज रडवेला झाला .तिच्या अावाजातला हा बदल मला स्पष्टपणे जाणवला .मी नीट निरखून तिच्याकडे पाहू लागलो तिच्या डोळ्यांतून हळुहळु अश्रू ओघळू लागले तिची अशी अवस्था पाहून माझ्या मनाची घालमेल वाढू लागली .अचानक तीने माईक ठेवला आणि रडतच स्टेजवरून खाली उतरली .माझ्या पुढच्या रो मधे बसलेल्या तिच्या मैत्रिणी उठून तिच्याकडे जाऊ लागल्या .तिचा रडवेला चेहरा पाहून मला राहवल नाही .मी ही त्या मुलींमागोमाग तिच्या जवळ आलो .तिच्या मैत्रिणी तिच्या बाजूला घोळका करून उभ्या होत्या .मी माझ्या बॅगेतली पाण्याची बॉटल काढली आणि तिच्या समोर धरली . तिने ती हातात पकडली आणि एकदा माझ्याकडे पाहिलं .डोळे पाणावले होते ,नाक टोमॅटो सारख लाल झाल होत पण खरच रडताना ही ती फार सुंदर दिसत होती .माझ्या हातून बाटली घेताना तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या हाताच्या बोटांना झाला आणि माझ्या बोटांपासून पूर्ण शरीरात एक करंट गेला त्या दोन क्षणांसाठी मला पूर्ण जगाचा विसर पडला अस वाटत होत तिथे फक्त ती आणि मी आहे .आम्हा दोघांशिवाय पूर्ण जग स्तब्ध झालय .मी फक्त तिच्याकडे एकटक पाहत होतो .तिने पाणी पिऊन माझी बॉटल मला परत दिली ती घेताना मी तिला एक स्माईल देण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात माझ्या पाठीवर थाप पडली .मी मागे वळून पाहिल मागे एक माणूस उभा होता हा तोच माणूस होता ज्याने थोड्या वेळा पूर्वी विकीला आणि मला हॉलबाहेर काढल होत .आता पुन्हा त्यानेच मला बाहेर काढल मग विकीला ही बाहेर यावं लागलं .विकी माझ्यावर भडकला होता .
" तुला काय गरज होती हिरो बनायची ?आपल्या क्लासमधल्या कोणत्या मुलीने साध पेन मागितलं तर देत नाहीस आणि तिच्यासाठी बॉटल घेऊन धावलास ."
विकी मला काहीही बोलला तरी मला त्याच वाईट वाटत नव्हत .स्मिता स्टेजवर गेल्यापासून ते आम्हाला बाहेर काढेपर्यंतची सहा मिनिटांचा वेळ कसा होऊन गेला मला कळलं ही नाही .
पहिल्या भेटीत मला तिच्या सौन्दर्याची ओळख झाली आणि दुसऱ्या भेटीत चातुर्याची .तेच पाहून मी तिच्यावर प्रेम करू लागलो .पण त्या वेळी जर तिच्या सौन्दर्य आणि चातुर्यासोबत तीच मन, तिचे हेतू आणि तिची नियत ओळखली असती तर आज माझी अशी परिस्थिती झाली नसती .
आज मला आणि माझ्या मित्रांना कॉलेजमधून रस्टीकेट केलं आहे .एका दिवसात आमचं कॉलेज लाईफ ,आमचं शिक्षण ,आमचं भविष्य संपून गेलं .ज्या अभिमानच्या प्रामाणिकपणावर त्याच्या पप्पांना गर्व होता ,ज्या अभिमानच्या खरेपणावर त्याच्या मम्मीला विश्वास होता ,ज्या अभिमानच्या भोळेपणावर त्याच्या दादाला दया यायची .तोच अभिमान आज जेलमध्ये गुन्हेगारांसारखा बसला होता .हे सगळं फक्त तिच्यामुळे झालं होतं .आज सर्वात जास्त राग मी फक्त तिचाच करत होतो .आता अख्ख्या जगात माझी एकच शत्रू होती ती "स्मिता जहांगीरदार"
...स्मिता...
माझा पूर्ण वाडा लहान बाळाचं हसू ऐकायला आसुसलेला होता .माझ्या रूमच्या चारही भिंतीवर आईने गोंडस बाळांचे फोटो लावले होते .मामाने तर आतापासूनच खेळणी आणायला सुरुवात केली होती .मी आयुष्यभर देवाला आणि स्वतःच्या नशिबाला बोल लावत राहिले .मी स्वतःला आजपर्यंत कमनशिबी समजत होते .पण आज मला समजत होत मी फार नशीबवान होते .
मी स्मिता ...स्मिता जहांगीरदार . जहांगीरदारांच्या घरातली एकुलती एक मुलगी .दादानंतर आठ वर्षांनी माझा जन्म झाला आणि जहांगीरदारांच्या वाड्याला कन्यारत्न प्राप्त झाल .माझ्या वडिलांना फक्त मुलगेच हवे होते मुलगी नको होती .पण देवाने माझ्या आईची इच्छा ऐकली आणि तिच्या पोटी एक मुलगी जन्माला आली .
आम्ही जहांगीरदार म्हणजे खानदानी जमीनदार .स्वातंत्र्यापूर्वी कित्येक गावांमध्ये आमची जमीन होती .अजूनही आम्ही तीनशे एकर जमिनीचे मालक आहोत .बाबा आमदार आहेत त्यामुळे घरात पैसा अडका , धनधान्य , इज्जत सगळ काही होत .मला पूर्वीपासून कसल्याच गोष्टीची कमी नव्हती .मी लहानपणीपासून श्रीमंतीत आणि लाडात वाढले होते पण तरीही माझ घर म्हणजे मला एक प्रकारचा पिंजराच वाटायचा .
हो ....' सोन्याचा पिंजरा ' कारण लहानपणापासून मला कसलही स्वातंत्र नव्हत होती ती फक्त बंधन .बाबा लहानपणापासून मी जे काही मागायचे ते अगदी क्षणात माझ्यासमोर हजर करायचे पण म्हणून त्यांच माझ्यावर प्रेम होत अस मी कधीच म्हणणार नाही कारण त्यांच्या प्रत्येक कृतीतून एक प्रकारची महत्वाकांक्षा , घमेंड जाणवायची की माझ्या मुलांची कोणतीही इच्छा मी चुटकीसरशी पूर्ण करू शकतो .इतर मुलींना जस वडिलांच प्रेम मिळत तस मला कधीच मिळाल नाही .बाबांनी मला कधी कुठे फिरायला नेल नाही , मी आजारी असताना कधी मांडीवर घेऊन झोपवल नाही , इतकंच काय कधी प्रेमाने दोन गोष्टी बोलले देखील नाहीत . त्यांच्यासाठी मी फक्त एक जवाबदारी होते निव्वळ एक जवाबदारी .माझ्या लग्नानंतर यातून ते मोकळे होणार होते .
माझी बारावीची परीक्षा झाल्यानंतर दोन महिन्यांनी दादाच लग्न होणार होत .लग्नाआधी सगळ्यांसोबत माझ्या हातावरही मेहंदी लावली गेली .तेव्हाच बाबांनी घरातल्यांसमोर जाहीर करून टाकल ह्या मेहंदीचा रंग उतरायच्या आत माझा साखरपुडा उरकून टाकायचा .मला अजून पुढे शिकायचं होत पण माझ्या बाबांच्या मत अस होत " मुलींना जास्त शिकवून करायचय काय ?? शेवटी त्यांना घरचं तर सांभाळायच असत ."
मी अकरावीत असतानाच त्यांनी त्याच्या मित्राच्या मुलाबरोबर माझ लग्न ठरवून टाकल होत .यात बाबांचा स्वार्थही होताच .त्यांचे ते मित्र मंत्री होते .जर त्यांच्या मुलासोबत माझं लग्न झालं तर बाबा त्यांच्या मदतीने भविष्यात मंत्री बनू शकत होते .मी त्या मुलासोबत आयुष्यभर सुखी राहू शकेन की नाही हा विचार त्यांच्या मनात अजिबात आला नाही .ज्याच्याशी माझ लग्न ठरल होत त्याच्या घरी एक दोनदा मी जाऊन आले होते .दादाच्या लग्नात मी त्याला पहिल्यांदा पाहिलं .तो मुलगा माझ्यापेक्षा जवळ जवळ सात ते आठ वर्षांनी मोठा होता .आडदांड शरीर , गळ्यात जाडजुड़ सोन्याच्या चैन , वाढलेल्या दाढी मिश्या असा काहीसा अवतार त्याला पाहूनच मला भीती वाटली .दोन चार रिकाम टेकड्या पोरांबरोबर जीपमधून गावभर फिरायचं , बारमध्ये मारामाऱ्या करायच्या, मुलींची छेड काढायची इतकंच काय त्याच्यावर तीन एक्स्ट्रॉशनच्या केसेससुद्धा होत्या .पण बाबांना या गोष्टींनी काही फरक पडत नव्हता .एका श्रीमंत घरात माझी पाठवणी करून ते माझ्या जवाबदारीतून मुक्त होणार होते .
दादाच्या लग्नादिवशी घरात आनंदी आनंद होता पण या आनंदाला मी अपवाद होते .मला माझ भविष्य दिसू लागलं होत . माझी आई बी एड पास होती .तिला लहान मुलांना शिकवायची फार आवड होती पण बाबांनी कधीच तीच इतक साध स्वप्न पूर्ण होऊ दिल नाही .आमचा वाडा म्हणजेच तीच विश्व होत .वाड्याबाहेर स्वतःच्या मर्जीने ती जास्तीच जास्त गावच्या मंदिरापर्यंत जाऊ शकत होती . घरातली स्त्री ही घरची लक्ष्मी असते .घर सांभाळण्याचा हक्क तिच्याकडे असतो पण बाबांसाठी माझ्या आईची किंमत एका मोलकरणीपेक्षा जास्त कधीच नव्हती .दिवसभर ती घरची काम करायची पण तरीही आजीकडून ओरडा मिळायचा .रात्री उशीरा बाबा दारू पिऊन यायचे ते कधी तिच्याशी प्रेमाने बोललेले किंवा तिला कोणती गिफ्ट आणल्याच मी पाहील नव्हत पण बाहेर काही बिनसल तर त्याचा राग मात्र तिच्या वरच काढायचे .कधी कधी हात ही उचलायचे .
ज्या घरात मी लग्न करून जाणार होते तिथेही अशीच परिस्थिती होती .मला हे अस आयुष्य जगायचं नव्हतं .माझ्या जीवनात काही फार मोठी स्वप्न नव्हती . फक्त समजून घेणारी माणस , प्रेम करणारा नवरा , एक शांत सुखी कुटुंब हव होत .पैसा , दागदागिने , गाडी नसल तरी चाललं असत पण आईसारख प्रेम करणारी सासू , अधून मधून थट्टा मस्करी करणारे सासरे , सुट्टिच्या दिवशी हातात हात घालून सिनेमाला नेणारा नवरा इतक्या साध्या इच्छा होत्या पण कदाचित हे सुख माझ्या नशिबात नव्हत .
माझी एक आत्या होती दोन वर्षापूर्वी ती वारली .तीच गावातल्याच एका गरीब मुलावर प्रेम होत पण आजोबांनी तीच जबरदस्तीने दुसऱ्याच एका माणसासोबत लग्न लावून दिल .लग्नानंतर दोन वर्ष तिला मूल झाल नाही म्हणून तिचा नवरा तिला इथे सोडून गेला तो परत न्यायला कधी आलाच नाही .काही महिन्यांनी कळल त्याने दुसर लग्न केलं पण दूसरी बायकोही त्यांना मूल देऊ शकली नाही कदाचित तिच्या नवऱ्यातच दोष असावा. पण या सगळ्यामुळे आत्या अगदी एकटी पडली तिला नंतर नंतर वेड्याचे झटकेही येऊ लागले . त्यातच ती बरळायची .
" बाईचा जन्मच वाईट ....पोरींनी ना पळून जाऊनच लग्न केली पाहिजेत ......मी ...मी पळून गेले असते ना ...तर आज फार फार खुश असते ."
तिला वेडी समजून सगळे तिच्याकडे दुर्लक्ष करायचे पण तिचे ते शब्द नेहमी मला आठवायचे .कधी कधी मला वाटायच आपल्यावर प्रेम करणारा एखादा मुलगा शोधावा आणि त्या बरोबर या सगळ्यापासून फार दूर जाव पण तेव्हाच आईचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा .मी जर अस काही केल तर तीच काय होईल या विचारानेच माझा थरकाप उड़ायचा .
बाबांनी म्हटल्याप्रमाणे दादाच्या लग्नानंतर वीस दिवसांनी माझ्या लग्नाचा मुहूर्त काढला .जस जस दिवस सरत चालले होते तस तशी माझी निराशा वाढत चालली होती .मी तेव्हा फार दुःखी असायचे .स्वतःला रूममध्ये बंद करून कोणत्यातरी कोपऱ्यात रडत बसायचे .देवाने मला असं आयुष्य का दिल याचा त्याला जाब विचारायचे .स्वतःच्या नशिबावर नाराज असायचे .
पण तेव्हा मला कुठे माहीत होतं ? की देवाने माझ्यासाठी इतकं सुंदर भविष्य लिहून ठेवल आहे .माझं भविष्य त्याच्यामुळे बदललं होत .त्याच्यामुळे मला इतकं चांगलं आयुष्य मिळालं होतं .तो माझ्यासाठी माणूस नाही देव होता .तो "अभिमान देशमुख"
आता तुम्ही विचार करत असाल .तो माझ्यासाठी देव कसा बनला ? अभिमान स्मिताचा म्हणजे माझा तिरस्कार करत होता .
अभिमान आणि माझ्यामध्ये काही नातं होत का ? जर नातं होत तर ते कसं बनलं ?
अभिमान माझ्यावर प्रेम करत होता का ? जर तो माझ्यावर प्रेम करत होता तर मीही त्याच्यावर प्रेम करत होते का ?
मी अभिमानचा तिरस्कार करत होते का ? की तो माझा तिरस्कार करत होता ? जर तो माझा तिरस्कार करत होता तर काय कारण होत त्या तिरस्काराच ?
।जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला माझी आणि अभिमानाची पूर्ण प्रेमकथा अॅमेझॉन किंडल वाचावीच लागेल .
" कदाचित हेच
Comments (0)