कदाचित हेच आहे प्रेम (sample) - अभिषेक दळवी (love novels in english TXT) 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «कदाचित हेच आहे प्रेम (sample) - अभिषेक दळवी (love novels in english TXT) 📗». Author अभिषेक दळवी
कदाचित
हेच आहे
प्रेम
(SAMPLE)
मी आता काळ्या दगडांनी बनलेल्या थंडगार जमिनीवर बसलो होतो .समोर जाड लोखंडी सळ्यानी बनलेला दरवाजा दिसत होता .छताला पिवळा बल्ब असलेला लॅम्प लटकत होता .त्या बल्बच्या प्रकाशात समोरच्या दरवाजा पलीकडून जो कोणीही मला पाहत होता त्याच्या डोळ्यांत मला राग ,घृणा आणि थोडीफार कीव दिसत होती .त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल फक्त हेच दिसू शकत होत .कारण आता मी माझं कर्तृत्व असलेल्या फुटबॉलच्या ग्राउंडवर नव्हतो ,माझा वारसाहक्क असलेल्या पप्पांच्या ऑफिसमध्ये नव्हतो किंवा ऐशोआराम असलेल्या माझ्या आलिशान बंगल्यामध्ये नव्हतो .मी आता जिथे होतो त्या जागी सभ्य लोकांचा आजन्म संबंध येत नाही इतकंच काय वाईट लोकही इथे यायला घाबरतात कारण त्या जागेला ' तुरुंग 'म्हणतात .
मी अभिमान, अभिमान देशमुख .एका प्रसिद्ध बिजनेसमनचा मुलगा .पुण्याला स्वतःची स्वप्न पूर्ण करायला आलो होतो .आयुष्य एका नव्या पद्धतीने, वेगळ्या दिशेने सुरू करायची माझी इच्छा होती .पण मला काय माहीत होतं इथे येऊन माझ्यासोबत अस काही होईल की माझं आयुष्य, माझं भविष्य पूर्णपणे बदलून जाईल .मला आजही आठवतो तो माझ्या कॉलेजचा पहिला दिवस .
त्या दिवशी मी सकाळी लवकर उठून रूमसमोरच्या गॅलरीमध्ये उभा होतो .नुकताच पाऊस येऊन गेला होता .समोरच्या पिंपळाच्या झाडाच्या पानांत साचलेल पाणी थेँबे थेँबे ठिबकत होत .वातावरणात चांगलाच गारवा पसरला होता .आभाळ मेघांनी गच्च दाटल होत .आठ वाजून गेले होते तरी आकाशात सूर्याचा लवलेशही नव्हता .ढगांमुळे चांगलीच अंधारी दाटून आली होती .
अस पावसाळी वातवरण पाहील की मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसलेल्या सुप्त आठवणी नुकत्याच कोषातून बाहेर पडलेल्या फूलपाखराप्रमाणे स्वैर धरू लागतात .लहानपणी दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर असच एका सकाळीच सकाळी आई लवकर उठावायची मग आळस देत शाळेची तयारी व्हायची .कोरा करकरीत रेनकोट अंगावरुन चढवून अशाच रिमझिम पावसातून चिखल तुडवत शाळेत यायच .फार दिवसांनी उघडल्याने कुंद हवेने भरलेले वर्ग , शाळेच्या मागच्या तलावावरून येणारा थंड वारा ,नवीन वह्या पुस्तकांतून दरवळणारा कागदी सुगंध पण खर सांगायच तर इतक्या उत्साही वातावरणातही थोडा फार कंटाळा यायचाच तो इतक्या सुट्टीनंतर पुन्हा शाळेत जायचा .
आजही मी लवकर उठलो होतो अगदी तशीच सकाळ , तेच वातावरण पण आज मला अजिबात कंटाळा आला नव्हता कारण आज माझा शाळेचा नाही तर कॉलेजचा पहिला दिवस होता .मी इंजिनियरिंगसाठी पुण्याला आलो होतो .आयुष्यात पहिल्यांदा घरापासून इतक्या लांब आलो होतो .मी घरात सर्वांचा लाडका होतो म्हणून मी जेव्हा इथे यायला निघालो .तेव्हा मम्मीने विरोध केला होता की,
" इतका लाडात वाढलेला मुलगा हॉस्टेलला कसा राहणार वैगरे ...." पण पप्पांनी
" अग जरा बाहेरच जग कळू दे त्याला अजून किती दिवस त्याचे लाड करणार आहेस ?" बोलून तिला गप्प केल .तिला पप्पांचा स्वभाव माहीत होता म्हणून ती ही जास्त काही बोलली नाही .मी इकडे येताना ती थोडी दुःखी झाली होती .पण मी मात्र फार खुश होतो .
टपरीवरच्या चहाची काचेवर जमा झालेली वाफ मी शर्टाने पुसून डोळ्यांवर चश्मा चढवला .समोर माझ कॉलेज दिसत होत .प्रशस्त लोखंडी गेटमधून मी आत आलो .सहा मजली कॉलेजची इमारत चांगली लांबच लांब पसरली होती .इथे इंजिनियरिंग बरोबर डिग्री ,डी एड़ आणि लॉ ही होत .ग्राउंडवर मुल क्रिकेट , फूटबॉल खेळत होती .त्यांना फुटबॉल खेळताना पाहून मलाही फुटबॉल खेळायची फार इच्छा होत होती .मी शाळेत असताना चांगला फुटबॉल प्लेयर होतो .पप्पांच्या सांगण्यावरून आठवीला सोडलेला फुटबॉल पुन्हा सुरू करण्याची फार इच्छा होत होती .पण तूर्तास तो विचार बाजूला ठेवून मी बिल्डिंगमधे एंट्री घेतली .इतक्या मोठ्या बिल्डिंगमधे लवकरात लवकर मला माझा बॅच नंबर शोधायचा होता कारण लेक्चर दहा वाजता सुरू होणार होते आणि माझ्या घड्याळात दहा वीस झाले होते .प्रत्येक नोटिस बोर्डवर लावलेल्या लिस्टमधे मी माझ नाव शोधत पुढे चाललो होतो इतक्यात माझ्या पाठीवर थाप पडली .
" फ्रेशर ??" मागून आवाज आला .
मी मागे वळून पाहील .मागे ढोपरावर फाटलेली जीन्स , ब्लेडने कापून डिझाइन बनवलेले टीशर्ट , गळ्यात लॉकेट , कानात बाळी , केसांना कलर अशा अवतारातली शुद्ध मराठीत सांगायच झाल तर उड़नटप्पु दिसणारी चार मूल उभी होती .त्यातल्या एकाने मला विचारल होत .मी ही होकारार्थी मान डोलावली .
" नाव काय आहे ?" दुसऱ्याने विचारल .
" अभिमान देशमुख ." मी म्हणालो .
" क्लास शोधतोयस ??" पहिल्याने विचारल .
" हो ." मी म्हणालो .
" कोणती स्ट्रिम ??"
" मेकॅनिकल "
"ओहह इंजिनियरिंग ?"
"येस " मी म्हणालो .
" ए रॉकी याच नाव चेक कर लिस्टमध्ये बघ कोणत्या क्लासमध्ये आहे ."
" हा जी २७ मधे आहे " तिसऱ्या मुलाने सांगितल .
" अरे लेक्चर केव्हाच सुरू झाला तुझा . लवकर जा या फ्लोअरवर शेवटचा क्लास " त्या मुलाने सांगितलं .पण हे सांगताना त्या मुलाच्या ओठांवर एक मिश्किल हसू होत . काहीतरी गडबड आहे असा मला संशय येत होता पण आता उशीर झाला म्हणून मी जास्त विचार न करता शेवटच्या क्लासरूमकडे धावत पळत आलो आणि आत घुसलो .
आत दोन मुली आरशासमोर उभ राहून केस विंचरत होत्या , एक लिपस्टीक लावत होती , एक लेडीज शिपाई लादी पुसत होती तितक्यात एक मुलगी मला पाहून जोरात किंचाळली आणि समोरच्या टॉयलेटमध्ये जाऊन दरवाजा बंद केला .त्या मुलांनी मला सबशेल उल्लू बनवल होतं .मी गर्ल्स वॉशरूममध्ये आलो होतो आणि एखाद्या बंगल्यामधल्या श्रीमंत लोकांच्या पार्टीत कोणा भिकाऱ्याने भुकेच्या आशेने प्रवेश करावा आणि नंतर त्या भिकाऱ्याकडे लोकांनी ज्या नजरेने पाहावं अशा काहीश्या नजरेने त्या मुली माझ्याकडे पाहत होत्या .त्या मला काही बोलायच्या आत मी विजेच्या वेगाने त्या रूममधून बाहेर आलो .
" देवाने दिलेत ना दोन डोळे .बघून येता येत नाय का आत " त्या रूममधून आवाज येत होता कदाचित त्या लेडी शिपाईचा असेल .
समोर ती मघासची चार मुलं उभी होती ज्यांनी मला फसवलं होतं .ते माझ्यावरच हसत होते त्यांना पाहून मला फार राग आला .त्यातलाच एक माझ्या जवळ चालत आला .
" सॉरी मित्रा .थोडी मस्करी केली .फर्स्टफ्लोअरवर तिसरा क्लास आहे तुझा " त्याने सांगितल .
त्यांच्याशी भांडत बसायला माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता .मी दुर्लक्ष करून फर्स्टफ्लोअरवरच्या तिसऱ्या क्लासरूमध्ये आलो .आत कोणीही प्रोफेसर माझ्या नजरेस पडत नव्हता .कदाचित पहिला दिवस असेल म्हणून लेक्चरला कोणी प्रोफ़ेसर आला नसेल .क्लासमध्ये ऐकून पाच रो होते दोन मुलींचे आणि तीन मुलांचे. मुलींच्या रो मध्ये प्रत्येक बेंचवर मुली बसल्या होत्या .पण मुलांच्या रो मध्ये सगळी मुल अगदी नेहमीच्या सवयीप्रमाणे पहिले दोन बेंच सोडूनच बसले होते .चौथ्या रो मध्ये फक्त पहिल्या बेंचवर एक गोरागोमटा , कुरळ्या केसांचा , गोबऱ्या गालाचा , डोळ्यांवर भलामोठा चश्मा लावलेला एक मुलगा बसला होता .प्रत्येक शाळेत , कॉलेजमध्ये असा एक तरी प्राणी असतोच जो भूकंप येऊ देत अथवा त्सुनामी काहीही झाल तरी लेक्चर अटेंड करणारच आणि येऊन पहिल्या बेंचवरच बसणार मग भलेही समोरचा कोणी म्हातारा प्रोफ़ेसर बोलताना त्याच्या तोंडातील दवबिंदु त्याच्या अंगावर उडाले तरी त्याला चालतात .अर्थात मी ही ज्युनीयर कॉलेजला असताना असाच होतो पण आता मला तस अतिसभ्य आयुष्य जगायची अजिबात इच्छा नव्हती .मी मुद्दाम तिसऱ्या रोच्या चौथ्या बेंचवर येऊन बसलो .माझ्या बाजूला बसलेल्या मुलाने मला एक स्माईल दिली आणि मागच्या मुलांशी बोलू लागला .तो त्या दोघांना फॉर्म भरायला मदत करत होता .पुढच्या बेंचवर बसलेला मुलगा एफ.एम. ऐकत होता .मी घड्याळात पाहील दहा पंचवीस झाले होते .प्रोफ़ेसरचा अजून काही पत्ता नव्हता .मी आजुबाजुला पाहील काही मुल फॉर्म भरत होती , काही एकमेकांशी ओळख करून घेत होती , माझ्या उजवीकडे मुलींचा रो होता , तिथे मुली घोळका करून बसल्या होत्या त्यांचे हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते , माझ लक्ष सहज माझ्या बाजूच्या बेंचवर बसलेल्या मुलीकडे गेल .का कुणास ठावूक पण तिला बघताच मला अस जाणवलं ही मुलगी बाकीच्या मुलींपेक्षा वेगळी आहे .पूर्ण क्लासमधल्या सगळ्या मुली टाईमपास करत होत्या पण ती एकटीच अशी मुलगी होती जी कोणत तरी पुस्तक वाचत होती .मला आधीपासून मेकअप ब्युटीजपेक्षा अशा साध्या सरळ , अभ्यासू मुलीच फार आवडायच्या .पण माझ नशीबच फुटक माझ्या कॉलेजमधे ज्या मुली होत्या त्या माझ्याकडेच नोटस मागायच्या आणि ज्या एक दोन अभ्यास करणाऱ्या होत्या त्या दिसायला इतक्या चांगल्या नव्हत्या .पण आता माझ्या बाजूला बसलेली मुलगी दिसायलाही फार सुंदर होती .मी अजून तिचा चेहरा बघितला नव्हता पण माझा सिक्स्थ सेन्स मला तस सांगत होता .मी तिच्या डाव्या बाजूला बसलो होतो आणि त्याच बाजूने तिचे केस तिच्या चेहऱ्यावर रूळत होते ,केसांमधून दिसणारी तिची गोरीपान मान , गुलाबी सलवार कमीज , जमिनीवर काढलेल्या ओल्या सँडलशी चाळे करणारी पावले , किनकिनाऱ्या चंदेरी बांगड्या घातलेले नाजुक हाथ एवढ पाहून मला एक गोष्ट चांगलीच समजली होती की ही मुलगी फार सुंदर असणार . माझ्याकडे कोणाच लक्ष नाही याचा अंदाज घेऊन मी पुन्हा तिच्या केसांमधून तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागलो .आयुष्यात पहिल्यांदा कोणा मुलीकडे मी अशा तऱ्हेने पाहत होतो . कदाचित वयानुसार वाढणार आकर्षण असेल किंवा आतापर्यंत पाहिलेली ती सर्वात सुंदर मुलगी असेल किंवा अजून काही कारण असेल पण तिला पाहत राहावंस वाटत होत .तिला पाहण्याची माझी ही तळमळ कदाचित देवालाही जाणीवली असेल त्याने माझी मदत केली .त्या मुलीने फिक्कट मेहंदीने सजलेल्या तिच्या नाजुक बोटांनी चेहऱ्यावर आलेले केस हलकेच कानामागे सारले .मी तिला पाहिलं रुंद कपाळ , कोरीव भुवया , पाणीदार डोळे , रेखीव नाक , गुलाबी ओठ , गोबरेगाल पाहून माझ्या ओठांवर आपोआप स्माईल आली .तिच्या हातात असलेल्या पुस्तकात तिने काही वाचलं आणि खुदकन हसली .हसण्यामुळे तिच्या गालावर उमटलेली खळी पाहून मी त्या पुस्तकाच्या लेखकाचे मनोमन आभार मानले .मी अगदी एकटक तिच्याकडे पाहत होतो . तिला हे जाणवलं असाव तिने माझ्याकडे पाहील आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या .मी लगेच माझी नजर फिरवली आणि दूसरीकडे पाहू लागलो .माझ्या काळजाचा चुकलेला ठोका स्पष्टपणे मला जाणवत होता .मी पुन्हा चोरून तिच्याकडे पाहणार इतक्यात दरवाजातून एक तीस पस्तीस वर्षाची स्त्री आत आली त्या प्रोफ़ेसर वाटत होत्या पहिला लेक्चर त्यांचाच असावा .
कॉलेजच्या पहिल्या दिवशी ज्या गोष्टी होतात त्याच आता सुरू होत्या .प्रत्येक जण उभ राहून आपापली ओळख सांगत होता .पहिल्या रो च्या सगळ्या मुलींनी आपली ओळख सांगितली होती .आता दुसऱ्या रो च्या मुलींची वेळ होती .मला या टाईमपासमध्ये काही रस नव्हता म्हणून मी दुर्लक्ष करत होतो .तितक्यात माझ्या डोक्यात प्रकाश पडला ह्या मुली आपली ओळख सांगत आहेत म्हणजे मघाशी ज्या मुलीला मी पाहत होतो तीच नाव सुद्धा मला कळू शकतं .तिच्या मागे एक बेंच सोडून बसलेली मुलगी आता इन्ट्रोडक्शन देत होती .तीन मुलींनंतर तिचा नंबर होता मी लक्ष देऊन ऐकू लागलो .मागच्या बेंचवर बसलेली मुलं गोंधळ करत होती .पहिला दिवस असल्याने मॅमही त्यांना काही बोलत नव्हत्या .पण त्यांच्या आवाजामुळे मला मुलींच्या तोंडून येणारा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता .आता काहीही करून मला ही सुवर्णसंधी सोडायची नव्हती .माझ्या बाजूच्या मुलीचं नाव माहिती करून घ्यायच मी पक्क ठरवल .डोळे घट्ट मिटून कानांत प्राण एकटवून मी तीच नाव ऐकण्यासाठी तयार झालो आणि तिचा नंबर आला .
" स्मिता जहांगीरदार " बोलून ती खाली बसली .
तिचे ते शब्द , तिचा तो आवाज कितीतरी वेळ माझ्या कानांत घुमत होता मी डोळे मिटून माझ्याच विश्वात गुंग होतो .मला भानावर आणलं ते माझ्या शेजारी बसलेल्या मुलाने .स्मितानंतर तिच्या पुढच्या तीन मुली माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा नंबर कधी येऊन गेला मला अजिबात कळलदेखील नाही .मी पटकन उठलो .
" अभिमान देशमुख ...नाशिक " बोलून मी पटकन खाली बसलो .
पण त्या मॅमनी मला पुन्हा उठवलं
" अभिमान तू नाशिकमधून पुण्याला आलास ??" त्यांनी विचारलं .
" हो .अॅकचुअली तिथे जवळ पास चांगली कॉलेजेस नव्हती ." मी म्हणालो .
" नाशिकला बी एस्सीच एकही चांगल कॉलेज नाही ??" मॅमनी विचारलं .
" बी एस्सी नाही .मेकॅनिकल "
" तू इंजिनियरींगचा स्टुडंट आहेस ??"
" हो "
" अरे मग बी एस्सीच्या क्लास्समध्ये काय करतोयस ??"
" हा बी एस्सीचा क्लास आहे ??" मी आश्चर्याने किंचाळतच विचारलं .
माझ्या या प्रश्नावर क्लासमधली सगळी मुल जोर जोरात हसू लागली .ज्या चार मुलांमुळे मी लेडीज वॉशरूममध्ये घुसलो होतो त्यांचावर पुन्हा विश्वास ठेऊन मी चूक केली आहे ही गोष्ट आता माझ्या लक्षात आली होती .सगळे माझ्यावर हसत आहे पाहून मला फारच एंबॅरसिंग वाटायला लागलं .मी लगेच बॅग उचलून त्या क्लासरूममधून बाहेर निघालो .
त्या दिवशी सर्वांसमोर माझी फजिती झाली होती .सगळे माझ्यावर हसत होते .पण मला अजिबात वाईट वाटत नव्हतं .कारण त्या दिवशी मी त्या सुंदर मुलीला पाहिलं होतं .आयुष्यात पहिल्यांदा मी इतकी सुंदर मुलगी पाहिली होती .मी त्या नंतर काही दिवस तिच्याबद्दलच विचार करत होतो .
काही महिन्यानंतर मी तिला पुन्हा पाहिलं .तो पर्यंत मी तिला विसरूनच गेलो होतो .पण तिला पाहताच आमची पहिली भेट मला लगेच आठवली .त्या दिवशी मी सेमिनार हॉलमध्ये बसलो होतो .इंजिनियरिंगच्या स्टुडंट्सना तिथे अलाऊड नव्हतं तरीही विकी मला घेऊन तिथे घुसला .तिथे बी एस्सीचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा प्रोग्रँम चालू होता .तिथे प्रत्येक स्टुडंटला एक टास्क दिला होता कोणत्याही विषयावर किमान पाच मिनिट न थांबता बोलायचं होत .आधी एक मुलगा आला त्याने सुरुवात इंग्लीशमध्ये केली पण पुढे काय बोलायच तेच विसरला आणि शेवट हिंदीमध्ये करून निघून गेला.
" याला म्हणतात आले घोड्यावरून आणि गेले गाढवावरून ." विकीने कमेंट केली.
त्यानंतर एक मुलगी आली ती इतक्या फास्ट बोलत होती की काहीच कळत नव्हतं.
" ही इतक्या फास्ट बोलतेय ना जस काही कॉलेजमधे बॉम्ब ठेवलाय आणि तो फुटायच्या आत हिला कॉलेजमधून बाहेर पडायचय ." विकीने पुन्हा कमेंट केली.
नंतर एक मुलगा आला तो इतक्या हळु आवाजात बोलत होता की आम्हालाच
Comments (0)